जमिनीच्या वादातून भाच्याने मामाची कोयत्याने वार करून केली हत्या; सांगवी बुद्रुकमध्ये खळबळ
आजोबांच्या वडिलोपार्जित जमिनीतील आईच्या हिश्श्यावरून वाद; हल्ल्यात पोलीस पाटील अशोक येनपूरे यांचा मृत्यू, तिन्ही आरोपींना अटक.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे जमिनीच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. आजोबांच्या वडिलोपार्जित जमिनीतील आईचा हिस्सा मिळवून देण्याच्या वादातून भाच्यानेच आपल्या मामावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अशोक साधू येनपूरे (वय ५०) यांचा मृत्यू झाला. ते गावचे पोलीस पाटील होते. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मंदिराजवळ अडवून केला हल्ला
शेतातील काम आटोपून अशोक येनपूरे हे दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी गावातील लमनदेव मंदिराजवळ त्यांच्या भाच्याने त्यांना आवाज देऊन थांबवले. "मामा थांबा, मला तुमच्याशी बोलायचे आहे," असे सांगत त्याने त्यांची दुचाकी थांबवली.
सुरुवातीला बोलण्यातून सुरू झालेला संवाद काही क्षणांतच वादात बदलला. जमिनीच्या हक्कावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर धारदार कोयत्याने अशोक येनपूरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यावर, उजव्या कानावर आणि उजव्या हाताच्या दंडावर वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
आईच्या जमिनीतील हिश्श्यावरून सुरू होता वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची आई लीलाबाई यांच्या वडिलोपार्जित जमिनीतील हक्क सोडपत्र करून देण्यावरून अशोक येनपूरे यांच्याशी वाद सुरू होता. आईच्या वाट्याची जमीन मिळवून देण्याच्या मुद्द्यावरून हा वाद वारंवार उफाळून येत होता. याच वादातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृतदेह पोलीस ठाण्यासमोर; महिलांचा रुग्णवाहिकेला घेराव
हत्येच्या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. अशोक येनपूरे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून राजगड पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी गावातील महिलांसह ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला घेराव घातला.
आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह येथून हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांच्या आश्वासनानंतर तणाव निवळला; तिघांना अटक
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना आरोपींना तातडीने अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जमिनीच्या वादातून नात्यांचा अंत!
वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्कावरून सुरू झालेला वाद एका पोलीस पाटलाच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने सांगवी बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जमिनीच्या हिश्श्यावरून जवळच्या नात्यांमध्ये निर्माण झालेला संघर्ष या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वाचकांच्या प्रतिक्रिया
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!
