मुख्य मजकुराकडे जा
लोकमान्य न्यूज – महाराष्ट्राची विश्वसनीय बातमी
ब्रेकिंग न्यूज

शेटफळगडे औषध चोरीप्रकरणाला नवे वळण; रात्रीच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

केवळ महिला डॉक्टरांवर कारवाई नको; दोषी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

LOKMANYA NEWS
शेअर करा:
पुणे : इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध चोरीप्रकरण आता नव्या वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणी महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या औषधांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, चोरीच्या वेळी आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी काय होती, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी चोरी रोखण्याचा प्रयत्न केला का? वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना तत्काळ माहिती का दिली नाही? तसेच औषध निर्माण अधिकारी रजेवर असताना स्टोअर रूमची मुख्य चावी संबंधित डॉक्टरांकडे कशी आली? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, औषधांचा काळाबाजार किंवा अन्य काही गैरप्रकार झाला आहे का, याचाही तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या सर्व आरोपांची पोलिसांच्या निष्पक्ष तपासातून पडताळणी होणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांनी या प्रकरणाला प्रसिद्धी देत पाठपुरावा केला आहे. तरीही केवळ एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करून प्रकरण थांबवू नये. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे. अहवालानंतर दोषींवर कारवाई : जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकार यांनी सांगितले की, पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. पोलिसांनी योग्य तपास करून जिल्हा परिषदेला अहवाल सादर करावा. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. कोणत्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले : चौकशी समिती अध्यक्ष चौकशी समितीचे अध्यक्ष डॉ. ओंकार हेंद्रे यांनी सांगितले की, घटनेच्या रात्री उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत ठोस माहिती समोर आल्यास त्यानुसार निर्णय घेतला जाईल. केवळ डॉक्टरांवर कारवाई नको, सर्वांची चौकशी करा : संतोष रकटे ग्रामस्थ संतोष रकटे यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "गोरगरीब रुग्णांच्या हक्काची औषधे चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. महिला डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला, ही समाधानाची बाब आहे. मात्र, चोरीच्या वेळी ड्युटीवर असलेले इतर कर्मचारी काय करत होते, त्यांनी चोरी रोखण्याचा प्रयत्न का केला नाही आणि वरिष्ठांना किंवा पोलिसांना तत्काळ माहिती का दिली नाही, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे." यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, या प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीची भूमिका तपासून ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी रकटे यांनी केली आहे. आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
शेअर करा:

वाचकांच्या प्रतिक्रिया

सर्व प्रतिक्रिया प्रकाशनापूर्वी तपासल्या जातात.

अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!