मुख्य मजकुराकडे जा
लोकमान्य न्यूज – महाराष्ट्राची विश्वसनीय बातमी

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून इंदापूरमध्ये नवा वाद; तहसीलदारांना थेट इशारा!

अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्यात ठाण मांडलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर करा; नागरिकांच्या तक्रारींची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची विकास क्षेत्रीय यांची मागणी

Lokmanya newsअद्यतनित: २१ नोव्हेंबर, २०२६ रोजी २:३८ AM वाजता
शेअर करा:
फॉलो करा:

इंदापूर : इंदापूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सामूहिक बदलीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्यात कार्यरत असलेल्या स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर कराव्यात अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

  • नागरिकांच्या तक्रारींचीही चौकशी करा

सर्वसामान्य नागरिकांच्या कामकाजात होणारी दिरंगाई, कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि कार्यालयातील प्रशासकीय पारदर्शकतेचा अभाव या बाबींची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिकाही समितीने मांडली आहे.

  • केवळ तालुक्यापुरत्या नव्हे, जिल्ह्याबाहेरही बदल्या करा

कर्मचाऱ्यांच्या बदल्या केवळ इंदापूर तालुक्याच्या आसपासच्या ठिकाणी न करता सेवा नियमांनुसार पुणे जिल्ह्याबाहेरही करण्यात याव्यात, अशी स्पष्ट मागणी समितीने केली आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या दूरच्या जिल्ह्यांमध्ये बदली करण्याबाबत विचार व्हावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मुद्दाही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या सोयीपेक्षा जनहित महत्त्वाचे

सामूहिक बदलीसाठी निवेदन देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करताना सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे. जनतेच्या हितापेक्षा कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सोयीला महत्त्व दिले जाऊ नये, अशी भूमिका समितीने घेतली आहे.

कार्यवाहीची लेखी माहिती देण्याची मागणी

समितीच्या निवेदनावर प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती समितीला द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने पआंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते आणि अनेक वर्षांपासून एकाच तालुक्यात कार्यरत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे इंदापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा:

वाचकांच्या प्रतिक्रिया

सर्व प्रतिक्रिया प्रकाशनापूर्वी तपासल्या जातात.

अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!