मुख्य मजकुराकडे जा
लोकमान्य न्यूज – महाराष्ट्राची विश्वसनीय बातमी

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या शताब्दीची तयारी सुरू; सुविधांसाठी प्रशासनाची धावपळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भेटीला १०० वर्षे पूर्ण; अनुयायांसाठी पाणी, स्वच्छतागृहे, वाहनतळासह विविध सुविधांचे नियोजन

Lokmanya news
१ / ३
शेअर करा:
फॉलो करा:

पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याला २०२७ मध्ये शताब्दी वर्षाचे औचित्य लाभणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना दिली होती. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने १ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्याच्या तयारीला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. शताब्दी वर्षानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्यांच्या सुविधांसाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जात आहे.

  • अनुयायांसाठी विविध सुविधांचे नियोजन

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भेट देऊन उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधांची पाहणी केली. यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळ, बुक स्टॉल, हिरकणी कक्ष, निवारा कक्ष आणि कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष यांचा समावेश आहे. याशिवाय रक्तसंकलन केंद्र, प्रसारमाध्यमांसाठी व्यासपीठ, नियंत्रण कक्ष तसेच मानवंदना कार्यक्रमाच्या निवेदनासाठी आवश्यक व्यवस्थांचाही आढावा घेण्यात आला.

या पाहणीवेळी हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पाटील, पीएमपीएमएलचे प्रतिनिधी यशवंत हिगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल राठोड, डॉ. आयेश फातेमा, रामदास लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शांतता आणि सुरक्षिततेवर भर

शताब्दी वर्षाचे महत्त्व आणि संभाव्य गर्दी लक्षात घेता अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. बार्टीच्या माध्यमातून सर्व संबंधित शासकीय विभागांमध्ये समन्वय साधला जात असून, सोहळ्याच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला जात आहे. अभिवादन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, यावर प्रशासनाचा भर आहे.

शेअर करा:

वाचकांच्या प्रतिक्रिया

सर्व प्रतिक्रिया प्रकाशनापूर्वी तपासल्या जातात.

अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!

महाराष्ट्र – आणखी बातम्या

सर्व बातम्या पहा